सुधीर चेके पाटील, चिखलीMaharashtra Vidhan Sabha election 2024: चिखली मतदारसंघात भाजप महायुतीच्या विद्यमान आमदार श्वेता महाले विरुद्ध काँग्रेस मविआचे राहुल बोंद्रे यांच्यात थेट लढत होत आहे. सुरवातीला इथली लढत तुल्यबळ वाटत होती; परंतु राहुल गांधींची सभा ऐनवेळी रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचल्याचे चित्र आहे. अंतिम टप्प्यात मात्र ही लढत एकांगी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
चिखली मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यंदा येथे २४ उमेदवार रिंगणात असले तरी, सामना परंपरागत प्रतिस्पर्धी भाजप व काँग्रेसमध्येच आहे. भाजप उमेदवार श्वेता महाले पाच वर्षांतील विकासकामांचा मुद्दा घेऊन मैदानात उतरल्या आहेत.
बोंद्रेंनीही विकासाला प्राधान्य देण्याचे सांगत भयमुक्त वातावरण निर्मितीला प्राधान्य राहील, अशी भूमिका घेतली आहे; परंतु, बोंद्रेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेला राहुल गांधी आले नाहीत, त्याचा फटका बोंद्रेंना बसल्याने तुल्यबळ वाटत असलेली लढत काहीशी एकांगी होते की काय, अशी स्थिती आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
- गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढविली जाते. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर येथे टीका करण्यास काँग्रेस उमेदवाराला तितकासा वाव नाही.
- चिखली शहराच्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नासोबतच पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १३२ काेटी रुपयांचा निधी आणत कायमस्वरुपी उपाययोजना महालेंनी केल्या आहेत.
- सिंचनासह शेतकऱ्यांचे अन्य प्रश्नही कळीचा मुद्दा आहे. नदीजोड प्रकल्पाद्वारे पैनगंगेपर्यंत पाणी आणण्याचा मुद्दाही अग्रभागी आहे. सौरऊर्जेचा मुद्दाही गाजत आहे. सध्या दडपशाहीच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यावर मतदाराचा कौल काय राहील हे तूर्तास सांगता येत नाही. रोजगार, औद्योगिक विकास हे मुद्देही चर्चेत आहेत.