मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेला एकतर्फी विजय राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला अठरा हत्तीचे बळ देणारा ठरला आहे. सहाजिकच उमेदवारीची सुप्त इच्छा असणारे भाजप नेते आपापल्या परीने विधानसभेच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे अनेक मतदार संघातील इच्छूक उमेदवारांची यादी लांबत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी रेखाताई खेडेकर पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या रेखाताई भाजपमध्ये प्रवेश करून चिखलीतून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.
२००९ आणि २०१४ या दोन्ही वेळी चिखली मतदार संघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी येथील काँग्रेस नेतृत्वच पक्षांतर करणार या चर्चेने मतदार संघातील वातावरण तापले होते. त्यामुळे एकदा नव्हे तर दोनदा विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांना यावर खुलासा द्यावा लागला. यावरून सध्यातरी काँग्रेसकडून चिखलीत राहुल बोंद्रेच प्रथम आणि अंतिम उमेदवार राहिल असंच दिसतय. परंतु, भाजपमधील चित्र वेगळ आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वांनी 'वेट एन्ड वॉच'ची भूमिका घेतली होती. परंतु, मोदी सरकार पुन्हा सत्तेत परतल्यामुळे अनेक नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामध्ये चिखलीतून रेखाताई खेडेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. रेखाताई यांनी सलग तीन वेळा या मतदार संघातून भाजपचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु, आता त्या पुन्हा एकदा भाजपकडून चिखलीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर श्वेता महाले यांनी देखील उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे.
या व्यतिरिक्त ध्रुपदराव सावळे यांनी देखील दंड थोपटले आहे. तसेच २०१४ मधील भाजप उमेदवार सुरेशअप्पा कबुतरे आणि भाजपचे निष्ठावंत विजय कोठारी यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. त्यातच भर म्हणजे, नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये दाखल झालेले कुणाल बोंद्रे यांच्या नावाची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे विद्यमान बोंद्रेंना टक्कर बोंद्रेच, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. एकूणच उमेदवारीसाठी सर्वच इच्छूकांची रस्सीखेच सुरू झाल्याचे चिखलीत चित्र आहे.
जागा वाटपात चिखली शिवसेनेकडे ?
पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि आता शिवसेनेत दाखल झालेले नरेंद्र खेडेकर यांना चिखली मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येईल अशी आशा आहे. यासाठी शिवसेना नेतृत्व प्रयत्न करणार असा त्यांना विश्वास आहे. नरेंद्र खेडकर यांच्यासह चिखलीतून भास्करराव मोरे, कपिल खेडेकर देखील इच्छूक आहे. भाजपमधील इच्छुकांची यादी पाहिल्यास, शिवसेनेला ही जागा मिळणे कठिण असले तरी, विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत एकापो टीकविण्याचे आव्हान भाजपसमोर राहणार आहे.