मुंबई : मागील चार वर्षांच्या तुलनेत राज्यात चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये ७८.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये १ हजार २६ चिकुनगुनियाचे रुग्ण होते, ही संख्या आता १ हजार ८३४ वर पोहोचली आहे. २०१९ आणि २०२० मध्ये या रुग्णांचे प्रमाण अनुक्रमे २९८, ७८२ इतके होते.राज्यातील अवकाळी पावसामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे चिकुनगुनियाचा प्रादुर्भावही वाढल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, राज्यात पाऊस दीर्घकाळ राहिल्याने आजारांत वाढ झाली आहे. डेंग्यूचा प्रसारही वाढला आहे. आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणेसह लोकसहभागही महत्त्वाचा आहे. नागरिकांनी स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय, लक्षणे जाणवल्यास त्वरित निदान आणि उपचार करायला हवेत. ताप, पुरळ, डोकेदुखी आणि मळमळ अशा तक्रारी असलेल्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले; आरोग्य विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 7:31 AM