शेगाव, दि. ३१- मलकापूर येथील १३ वर्षीय बालकाचे शिकवणी वर्गाला जात असताना चार अनोळखी इसमांनी अपहरणाचा प्रयत्न केला; मात्र शेगावात वाहन पोहोचल्यानंतर विद्यार्थ्याने आरडाओरड क रुन अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेवून पळ काढल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी शेगावात घडली. शेगाव येथील आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार अविनाश बबलु जयस्वाल (वय १३) रा. शिवाजी नगर, मलकापूर हा विद्याथी शुक्रवारी दुपारी नांदुरा रोडवरील एका खासगी शिकवणी वर्गाला जात असताना रस्त्यावर कुणी नसल्याचे पाहून ओमीनी कारमधून आलेल्या चार अपहरणकर्त्यांनी अविनाश याला वाहनात टाकुन शेगावकडे पलायन केले. यावेळी अविनाशच्या तोंडाला पट्टी बांधल्याने त्याला काहीही हालचाल करता आली नाही. दरम्यान शेगावपयर्ंत पोहोचल्यानंतर अविनाशने तोंडावरची पट्टी सरकवून आरडाओरड सुरु केली. अपहरणकर्त्यांनी रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबवून अविनाशला गप्प बसविण्याचा केला. दरम्यान, अविनाशने एका अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेत ओमीनी गाडीतुन उडी मारली व रेल्वे स्थानकाकडे पळ काढला. आपल्या हातुन बालकाने सुटका केली असल्याचे लक्ष्यात येताच अपहरणकर्त्यांनी तेथून वाहनासह पळ काढला. अविनाश रेल्वे स्थानकासमोर रडत असताना रवि केसरकर नामक ऑटो चालकाने अविनाशला रेल्वे स्थानकावर आणून आरपीएफ पोलिसांच्या ताब्यात दिले. एएसआय आर. बी. पाल यांनी लगेच याबाबतची सविस्तर माहीती बालकाकडून जाणून घेऊन मलकापूर येथे त्याच्या पालकाला कळवली. रात्री उशिरा अविनाशची आई आणि मामा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर आरपीएफने त्यांच्या ताब्यात दिले. अपहरणकर्त्यांना आपण ओळखत नसून त्यांच्या तोंडाला कपडा बांधलेला असल्याची माहीती अविनाशने पोलिसांना दिली. मलकापूर शहरातुन भरदिवसा बालकाचे झालेले अपहरण पाहता पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मलकापुरात बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न
By admin | Published: April 01, 2017 2:17 AM