मुंबई : राज्यात बालकांवरील अत्याचाराबाबतच्या घटनांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याची बाब आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. बालकांच्या हत्या, बालकांवरील बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली, असे ही पाहणी सांगते.बालकांवरील बलात्काराच्या २,३०५ घटनांत २०१७ मध्ये गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०१८ मध्ये ही संख्या २,६८८ इतकी होती. अपहरण प्रकरणी २०१७ मध्ये ८,८५० तर २०१८ मध्ये ९,१७४ गुन्हे नोंदविले गेले. २०१७ मध्ये बालकांच्या खुनाचे १४७ गुन्हे दाखल झाले, त्याच्या पुढील वर्षात ते १६९ इतके झाले. महिलांच्या अपहरणाचे गुन्हे वाढले.२०१७ मध्ये ते ६,२४८ होते. गेल्या वर्षी ते ७,७२७ इतके होते. हुंडाबळींची संख्या मात्र २३३ वरून १७४ वर आली. पती व नातेवाइकांकडून क्रूर कृत्ये केल्याबद्दल २०१७ मध्ये ६,५८४ गुन्हे नोंदविले गेले, गेल्या वर्षी त्यांची संख्या कमी होऊन ५,०१३ वर आली. महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे वाढून ते १२,१३८ वरून १४,०७५ वर गेले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतील गुन्हे ९५५ वरून १,०६४ वर गेले. बलात्काराच्या घटना २०१७ मध्ये ४,३२० इतक्या होत्या त्या नंतरच्या वर्षात ४,०७६ वर आल्या.३३,५५७ महिलांवर अत्याचारमहिलांसंदर्भातील विविध गुन्ह्यांची २०१६ मधील संख्या ३१,२७५ होती. २०१७ मध्ये ती ३२,०२३ इतकी तर नंतरच्या वर्षी ३३,५५७ इतकी झाली.
बालकांच्या अपहरणाचे प्रमाण वाढले; आर्थिक पाहणी अहवालातून निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 2:48 AM