नागपूर : अंधश्रद्धेने पछाडलेल्या एका कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवशी शेजारच्या पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. तर, वडील मृत्यूशी झूंज देत आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिप्टी सिग्नल भागात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.कुणाल दयालू खैरे (वय १९) असे मृतकाचे नाव असून, रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल असलेल्या त्याच्या पित्याचे दयालू खैरे (वय ४५) आहे. पुंजाराम वाडीतील गल्ली नंबर ४ मध्ये दयालू खैरे राहतात. त्यांच्या बाजूलाच आरोपी प्रेमलाल बंडू कोटले (वय ४५) याचे घर आहे. दोघेही परिवार कळमना मार्केटमध्ये मजुरी करतात. गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कुणालने आपल्या होमथियेटरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवायला सुरूवात केली. ते ऐकून आरोपी प्रेमलाल कोटले धावतच घराबाहेर आला. त्याने दयालूला घराबाहेर बोलवून ह्यहमारे घर की नई बहू को देवी के गाणे सुनने के बाद उसके शरिरमे देवता आते हैह्ण, असे म्हणत गाणे वाजविण्यास मनाई केली. त्यावरून दयालू आणि प्रेमलालमध्ये वाद झाला. बाचाबाची सुरू असताना आरोपी प्रेमलालचा मुलगा आशिष उर्फ चेतराम (वय २०) घरात धावत गेला. त्याने घरातून भाजी कापण्याचा चाकू आणला आणि दयालूच्या पोटावर, छातीवर चाकूचे घाव घातले. ते पाहून दयालूचा मुलगा कुणाल वडिलांना वाचविण्यासाठी धावला. आरोपी प्रेमलालचा मुलगा लंगडा उर्फ मनोज आणि रोशन कोटले (वय २६) हेदेखिल आले. त्यांनी कुणालवरही चाकूचे सपासप घाव घातले. त्यामुळे वडीलांसोबतच कुणालही रक्ताच्या थारोळळ्यात पडला. पिता-पुत्राला मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले.सोंगाने घेतला बळीसर्वत्र दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असताना घडलेल्या या घटनेमुळे पंजुराम वाडीत तीव्र शोककळा पसरली. कुणालची आई बिंदाबाई हिच्या तक्रारीवरून कळमन्याचे ठाणेदार महेश चाटे यांनी चारही आरोपींना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २३ आॅक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपी प्रेमलालच्या मुलाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले. त्याच्या सूनेच्या अंगात कथित देव यायचा. या सोंगामुळेच कुणालचा बळी गेला.
अंधश्रद्धेने पछाडलेल्यांकडून मुलाची हत्या, पिता गंभीर जखमी, ऐन दिवाळीच्या दिवशी विझला खैरे कुटुंबातील दिवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 9:12 PM