पुणे - एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा बालविवाह करून दिला होता. मात्र पीडित मुलीने प्रसंगावधान राखत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली आणि आपल्यावरील अन्यायाची माहिती दिली. त्यानंतर चाकणकर यांनी या मुलीची सुटका केली आहे.
खेड शिवापूर येथील एका सतरा वर्षीय मुलीचा तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने बालविवाह लावून दिला. सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या प्रचंड दबावामुळे या मुलीला घराबाहेर पडणे देखील अशक्य झाले होते. परंतु माहेरी आल्यानंतर युक्ती लढवत ती घराबाहेर पडली व तिने तडक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या घरी जाऊन त्यांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सुनावली. चाकणकर यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी देखील याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तात्काळ दखल घेत मुलीच्या माहेरच्या तसेच सासरच्या लोकांवर कारवाई केली व मुलीची रवानगी पुण्याच्या बाल सुधारणा गृहात केली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे बालविवाह रोखण्यासंदर्भात अतिशय सकारात्मक पाऊले उचलत असून समाजातून ही मानसिकता नष्ट व्हावी यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. बालविवाह प्रथा ही महाराष्ट्रातून हद्दपार व्हावी व त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जून महिन्यापासून राज्य महिला आयोगाच्या वतीने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे अशा ठिकाणी विशेष अभियान चालू करण्यात येणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली तसेच महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी जर बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास राज्य महिला आयोगाच्या १५५२०९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चाकणकर यांनी यावेळी केले.