यदु जोशी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रवीण घुगे यांनी बुधवारी स्वीकारली. परंतु अनेक कारणांनी त्यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिला व बालकल्याण खात्याने या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नेमण्यासाठी इच्छुकांकडून नामांकने मागविणारी जाहिरात दिली होती. त्यात अध्यक्ष वा सदस्याविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा असू नये, तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू नये, अशीही अट त्यात होती. मात्र दोन्ही अटी गुंडाळून ठेवून घुगे यांची नियुक्ती केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही नियुक्ती गुणवत्तेवर नव्हेतर, राजकीय बक्षिसी म्हणून झाल्याचे दिसते.घुगे यांच्याविरुद्ध हेलिकॉप्टरच्या पायलटला मारहाण केल्याप्रकरणी बीडमध्ये फौजदारी गुन्हा दाखल आहे. बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला. भादंवि कलम ४७, १४३, ३५३, ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण बीडच्या न्यायालयात प्रलंबित असल्याचेही सांगितले. बीडमधील भाजपाचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पायलटला हेलिकॉप्टर केज तालुक्यातील विडा येथे घेण्यास सांगितले. पायलटकडे मुंबई ते बीड, बीड ते परळी असाच मार्ग आखून दिलेला होता. त्यामुळे पायलटने विडा येथे जाण्यास नकार दिला. त्यावर मुंडे आणि पायलटमध्ये बाचाबाची झाली होती. कार्यकर्त्यांसमोर वाद नको म्हणून मुंडे मोटारीने निघून गेले. त्यानंतर घुगे आणि आठदहा भाजपा कार्यकर्त्यांनी पायलटला घेरले आणि साहेबांशी उद्धट वर्तन का करतो, असे विचारत मारहाण केली. तेथे नियुक्तीवर असलेल्या पोलिसांच्या जबाबाच्या आधारे बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात घुगे, स्वप्नील गलधर, उमेश फड, राजेंद्र बांगर, लईक फारूकी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ६ एप्रिल २०१४ रोजी घडली होती. अध्यक्ष वा सदस्य पदासाठीची व्यक्ती ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू नये, हीदेखील अट आहे. घुगे हे भाजपाचे मराठवाडा संघटक असल्याने या अटीचेही उल्लंघन झाले आहे. घुगे हे आधी गोपीनाथ मुंडे यांचे तर आता महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. अध्यक्षपदासाठी इच्छुक व्यक्तीने बालकांच्या कल्याण व विकासाशी निगडित अतिउत्कृष्ट कार्य केलेले असावे, अशीही अट होती. तथापि, घुगे यांनी या क्षेत्रात कोणते ‘अतिउत्कृष्ट’ काय कार्य केले, असा प्रश्नही समोर आला आहे. ३०० अर्जदार, नियुक्ती भलत्यांचीचबालहक्क आयोगाचे अध्यक्ष वा ंसदस्य पदासाठी इच्छुक असलेल्यांकडून महिला व बालकल्याण विभागाने २१ जुलै २०१६ रोजी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन अर्ज मागविले होते. त्यानुसार बालकल्याणाच्या क्षेत्रातील ३०० जणांनी अर्ज केले. पण त्यांना बाजूला सारून राजकीय नियुक्त्या करण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला आणि त्यात माझ्याविरुद्ध राजकीय स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. आपण म्हणता, त्या घटनेत पायलटला मारहाण झालेली नव्हती. केवळ बाचाबाची झाली होती. गुन्हा दाखल झाला होता हे खरे आहे. - प्रवीण घुगे, अध्यक्ष, बालहक्क आयोग
बालहक्क आयोगाचे अध्यक्षच वादग्रस्त
By admin | Published: June 01, 2017 4:06 AM