पुणे : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी आणि बालसाहित्यिक कमला लक्ष्मण (८८) यांचे शनिवारी त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नात असा परिवार आहे. याच वर्षी २६ जानेवारी रोजी आर.के. लक्ष्मण यांचे निधन झाले होते.कमला यांना श्वसनाचा त्रास होत होता. १५ दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारीच त्यांना घरी आणण्यात आले होते. कमला यांचा जन्म २२ आॅगस्ट १९२६ साली चेन्नई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण चेन्नई येथील सेंट थॉमस येथे झाले. वडिलांची दिल्ली येथे बदली झाल्याने पुढील शिक्षण इंद्रप्रस्थ येथे झाले. लग्नानंतरही आर. के. लक्ष्मण यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. जे. जे. स्कूल आॅफ आर्टमधून त्यांनी पहिला क्रमांक मिळविला.कमला यांनी १२ पुस्तकांचे लेखन केले आहे. यामध्ये लहान मुलांसाठी लिहिलेले ‘तम्मा’ हे पुस्तक विशेष गाजले. ‘छोटा हत्ती’, ‘द थामा स्टोरीज’ ही त्यांची लहान मुलांसाठीची पुस्तके होती. ‘तेनाली रामन’या पुस्तकावर दूरदर्शनने १३ भागांची मालिका केली होती. अमेरिका आणि सिंगापूर येथेही एशियन नेटवर्कमधूनही ही मालिका दाखविण्यात आली. त्यांना हस्तकलेसह आणि व्यंगचित्र काढण्याचाही छंद होता. आर. के. यांच्या यशामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. (प्रतिनिधी)
बालसाहित्यिक कमला लक्ष्मण यांचे निधन
By admin | Published: November 15, 2015 2:32 AM