ठाणे, दि. 10 - नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला सापडला आहे. कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला, तो वाशी स्थानकावरून अपहरण करण्यात आलेला मुलगा असल्याचं तिने ओळखलं. त्यानंतर तिने कळवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. तीन वर्षाच्या रघू शिंदेला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. मात्र, आरोपी फरार असून त्याने रघूचं अपहरण का केलं याबाबत अजून काहीही माहिती समजू शकलेली नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकावरुन 6 सप्टेंबर रोजी या तीन वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं. भरदिवसा करण्यात आलेलं हे अपहरण सीसीटीव्हीत कैद झालं होतं. सीसीटीव्हीत आरोपी चिमुरड्याला घेऊन जाताना स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरड्याची आई वाशी रेल्वे स्थानकाजवळ वडापाव विकत घेत होती. आपला मुलगा मागेच उभा असल्याने महिला निश्चिंत होती. मात्र नंतर मागे वळून पाहिल्यानंतर आपला मुलगा जागेवर नसल्याचं पाहून त्यांची धावाधाव सुरु झाली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी चिमुरड्याला घेऊन जात असल्याचं दिसून आलं.