लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षण घेणारी मुले-मुली अनेकदा लैंगिक अत्याचाराचे बळी पडत असल्याच्या घटना घडतात. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुला-मुलींना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यासंबंधीचा अहवाल पाठवावा, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहे. शिक्षण संचालकांचे आदेश प्राप्त होताच, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहेत. शाळा, वसतिगृह, आश्रमशाळांमध्ये किंवा इतर परिसरामध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. लैंगिक अत्याचार झाल्यानंतर ही मुले शिक्षणापासून दूर होतात. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते; परंतु याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. असे दिल्ली येथील राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोगाच्या निदर्शनास आल्याने, त्यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून अत्याचार पीडित मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाकडे वळवावे आणि शाळेत येण्यासाठी उद्युक्त करून आवश्यक ती मदत करावी, असे आदेश राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोगाने दिले. या आदेशानुसार शिक्षण संचालकांनी यासंदर्भात राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. या आदेशानुसार, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून लैंगिक अत्याचार पीडित मुला-मुलींना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास बजावले आहे आणि त्यासाठी मुख्याध्यापकांनी पीडित मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लैंगिक अत्याचार पीडित मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटून, त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. पीडित मुला-मुलींचे शिक्षण थांबू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजनासुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. मुख्याध्यापकांनादेखील सूचना देण्यात आल्या आहेत. - प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक.
लैंगिक शोषण झालेल्या मुला-मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्याचे आदेश!
By admin | Published: May 27, 2017 12:07 AM