कोल्हापूर : शित्तूर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आधार विद्यालय या निवासी शाळेतील कुपोषणाने अत्यवस्थ आणखी पाच मुलांना सोमवारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत रुग्णालयात दाखल केलेल्या मुलांची संख्या १२वर गेली आहे. या संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या तीन शाळांतील मुलांपैकी बहुतांशी मुले ही धुळे आणि ठाणे, मुंबई येथील आहेत.मानखुर्द मुंबई येथील बाल विकास समितीने ही मुले प्रेरणा संस्थेला हस्तांतरित केली आहेत. मात्र, एकूणच हे हस्तांतरण रीतसर प्रशासकीय प्रथेनुसार न झाल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.प्रेरणा संस्थेमधील निवासी शाळेतील गांधी (१५) नावाच्या मुलाचा शनिवारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मृत्यू झाला. त्याआधी महिन्याभरापूर्वीही याच शाळेतील एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांत १२ मुले सीपीआरमध्ये दाखल करण्यात आली. मात्र, ही सर्व मुले मुंबईतून शाहूवाडीला कशी आली याचा शोध घेता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. २३ जून २0१६ रोजी मानखुर्द, मुंबई येथील चाईल्ड वेल्फेअर कमिटीने ही सर्व मुले प्रेरणा संस्थेला वर्ग केली. मात्र, याबाबत अपंग आयुक्तालय, पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी यांना अधिकृत माहिती दिली गेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून ही मुले या शाळेत असताना, तसेच याआधीही एकाचा मृत्यू झाला असताना, शालेय आरोग्य तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना हे कळले कसे नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे. नेमका हाच प्रश्न जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी याबाबत घेतलेल्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांना विचारल्याचे समजते. जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग या सर्वांनाच हे प्रकरण शेकणार असल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
कुपोषित गतिमंद मुले धुळे, ठाणे, मुंबईची
By admin | Published: November 08, 2016 4:48 AM