लक्ष्मण मोरे / पुणेविकासाच्या प्रचंड वेगवान प्रक्रियेमध्ये वंचितांचा टक्काही तेवढ्याच झपाट्याने वाढत आहे. शिक्षणाच्या अभावाने आलेले त्यांचे ‘पिचले’पण दूर करण्यासाठी एका तरुणाने १६ वर्षांपासून ज्ञानयज्ञ मांडला आहे. मुलांना घडविण्यासाठी हा तरुण ‘बाल शिक्षण मंच’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे.औद्योगिक वसाहतीमध्ये रिक्षाचालक वडील आणि धुणीभांडी करणाऱ्या आईच्या पोटी अमरचा जन्म झाला. अमरने एमएसडब्ल्यूपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना पुणे महापालिकेने प्रौढ साक्षरता अभियानाची सुरुवात केली. त्यामध्ये त्याने स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. यानिमित्ताने त्याचा झोपडपट्टीतील अनेक कुटुंबांशी संवाद होऊ लागला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचा प्रभाव अमरवर पडला होता. अमरने वस्तीतील काही मुले गोळा केली. त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने स्थापन झाली ‘बाल शिक्षण मंच’ ही छोटेखानी संस्था. महापालिकेच्या शिक्षण मंडळाला विनंती करून मंचाने महर्षीनगर भागातील संत ज्ञानदेव शाळेचा एक वर्ग मागून घेतला. शाळेमधून सुटल्यावर ही मुले अभ्यासिकेत जाऊ लागली. सोळा वर्षांपूर्वी लहानग्यांना घेऊन सुरु केलेली अभ्यासिका आता विस्तारली आहे. झोपडपट्टीमधूनही उत्तम आणि सुशिक्षित व्यक्तिमत्त्वे घडू शकतात, हे अमरने दाखवून दिले आहे. ‘आम्ही उद्याचे शिल्पकार’ हा उपक्रम सध्या सुरू आहे.
वंचितांच्या मुलांसाठी...
By admin | Published: May 01, 2017 5:12 AM