- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : मोबाईलवरील ‘गेम’ शहरातील दोन विद्यार्थ्यांच्या अंगलट आला आहे. त्यामुळे दोघांच्याही पालकांची तब्बल ११ लाखाने फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. याशिवाय विविध संदेशाची हाताळणी केल्याने अनेक पालकांचे बँक खाते रिकामे होत असल्याचे धक्कादायक वास्तव हळुहळु पुढे येत आहे. त्यामुळे ‘ऑनलाइन’ अभ्यासक्रम अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते.कोविड संक्रमण काळात तब्बल नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लावण्यात आला. या कालावधीत शाळा, महाविद्यालय बंद होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाने सोशल माध्यमांचा वापर करीत ऑनलाइन अभ्यासक्रमाचा फंडा अंमलात आला. त्यामुळे मोबाईल वापरास मनाई करणाºया पालकांनीही विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास मुभा मिळाल्याने अभ्यासक्रमासोबतच विविध अॅप हाताळण्यास सुरूवात केली. काहींनी अभ्यासक्रमासोबतच ऑनलाइन गेम खेळण्यासाठी या संधीचा वापर केला. पालकांनी मुलांना दिलेली संधीच आता पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तर काही पालकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचीही धक्कादायक माहिती समोर येत आहे.
एकास साडेनऊ लाखाचा चूना! मोबाईलवर ‘गेम’खेळणे एकाच्या चांगलेच अंगलट आले. दररोज २९ हजार रूपयांप्रमाणे साडेनऊ लाखाची फसवणूक होईपर्यंत हा प्रकार घरातील मंडळीच्या लक्षातच आला नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राईमकडे वळता करण्यात आला आहे.
‘फायर’ गेम पडला दीड लाखात!शहरातील मुख्य वस्तीतील एका विद्यार्थ्याने फायर गेम खेळला. गेम खेळत असताना वडिलांच्या खात्याचा ओटीपी दिला. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या पालकाची टप्प्याने तब्बल दीड लाखाने फसवणूक झाली.
विविध संदेश हाताळणीचाही फटका! मोबाईलवर आमिष आणि प्रलोभणे देणारी अनेक संदेश येतात. पैसे जिंकल्याच्या संदेशाचाही यामध्ये समावेश आहे. तसेच डेटींग, चॅटींग आणि मिटींग सारखे शेकडो संदेश मोबाईल वर धडकतात. या संदेशाच्या गांभीर्याबाबत अनभिज्ञ असलेल्या अनेक लहान विद्यार्थ्यांकडून संबंधीत संदेश हाताळले गेलेत. त्यामुळे आता पालकांची खाती रिकामी होण्यास सुरूवात झाली आहे. साडेचार हजारांपासून, दहा हजारापर्यंत फसवणूक झाल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शाळांनी स्वत:च्या लाभासाठी सुरू केलेले ‘ऑनलाइन’ शिक्षण पालकांसाठी चांगलेच महागात पडत असल्याचे दिसून येते.
मोबाईलवर गेम खेळल्यानं साडेनऊ लाखाच्या फसवणूक प्रकरणाची शहर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. मोबाईलवर गेम खेळताना अथवा संदेशाची हाताळणी केल्यानंतर ओटीपी दिल्यास फसवणूक होऊ शकते. ऑनलाइन फसवणुकीच्या सहा-सात प्रकरणं आली आहेत. मुलांकडे मोबाईल देताना पालकांनी सतर्क असणे आवश्यक आहे.- सुनील अंबुलकरशहर पोलीस निरिक्षक, खामगाव.