मुलांनी किमान वृद्ध आई-वडिलांचे जीवन नरक बनवू नये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 05:49 AM2020-06-12T05:49:05+5:302020-06-12T05:49:27+5:30
मुंबई उच्च न्यायालय : तक्रार आली तर मात्र, कुठलीही तमा बाळगणार नाही
खुशालचंद बाहेती ।
मुंबई : आईला त्रास दिल्याची तक्रार आली तर मुलीला व तिच्या मुलाला आईच्या घरात पाय ठेवू देणार नाही, या शब्दात वृद्ध आईला त्रास देणाऱ्या एका महिलेस उच्च न्यायालयाने सुनावले. कोविडमुळे तिला सध्या आईच्या घरात राहण्याची परवानगी दिली; पण तक्रार आली तर कुठलीही तमा बाळगणार नाही, असे स्पष्ट केले. रोहिणी सोमकूरवार या निवृत्त सरकारी नोकर असून ७० वर्षांच्या आहेत. त्यांना ५ विवाहित मुली आहेत. यापैकी २ अमेरिका व सिंगापूरमध्ये राहतात, तर एक शिवाजीनगर दादरमध्ये. एक सरिता नावाची घटस्फोटित मुलगी आहे.
सरिता किशोर वयातच वाईटांच्या संगतीत गेली. आई-वडिलांच्या अनेक प्रयत्नानंतरही ती सुधारली नाही. २०१८ मध्ये पळून जाऊन तिने रोहित नावाच्या अपराधिक पार्श्वभूमी असलेल्या सोबत लग्न केले. २०२० मध्ये त्यांच्यात बेबनाव होऊन रोहित तिला व एका लहान मुलाला सोडून निघून गेला. यानंतर सरिता पुन्हा माहेरी आली. तिच्या स्वभावाची माहिती असणाºया पालकांनी तिची पर्यायी व्यवस्था होईपर्यंतच राहण्याची परवानगी दिली. पुढे तिला एचडीएफसी बँकेत नोकरी लागली व आर्थिक परिस्थिती सुधारली. तरीही तिने घर मात्र सोडले नाही. उलट घर सोडण्याचा तगादा लावला तर वडिलांविरुद्ध विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊ लागली. घाबरून आई-वडिलांनी गप्प राहणे पसंत केले. पुढे २०११ मध्ये वडील वारले. यानंतर आईचा त्रास वाढला. तिला बाहेर जाण्यावर, कोणाला भेटण्यावर बंधने घालण्यात आली. तिचा मोबाईल फोडला.
३ आॅगस्ट २०१८ रोजी संधी मिळताच ती बाहेर निघाली; पण रस्ता ओलांडताना रिक्षाची धडक बसल्याने दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागले. यानंतर ती अंथरुणाला खिळूनच होती. तिला फक्त एकदा थोडेसे जेवण मिळत असे. एप्रिल २०१९ मध्ये कविता नावाची मुलगी अमेरिकेतून आल्यानंतर तिने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार केले. ती परत अमेरिकेत गेल्यानंतर त्रास आणखी वाढला. मारहाणही होऊ लागली व बाहेर जाता येऊ नये म्हणून पूर्ण कपडे घालण्यासही मनाई होऊ लागली. फेब्रुवारी २०२० मध्ये वैशाली नावाची मुलगी सिंगापूरहून आली. तिच्या मदतीने पोलिसांत तक्रार केली. ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली सरिताला घरातून काढून टाकण्यासाठी ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाकडे अर्ज दिला; पण कोविडमुळे निर्णय होऊ शकला नाही. वैशालीला परत जायचे होते व गेल्यानंतर आईचे जगणे कठीण होईल म्हणून उच्च न्यायालयात अर्ज केला. सरिताने सर्व आरोप फेटाळत वैशालीच्या सांगण्यावरून आई तक्रार करते, असा दावा केला.
न्या. एस. जे. काथावाला व सुरेंद्र तावडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सवरून वैशाली, सरिता व आई रोहिणीशी बोलले. आईला प्रचंड त्रास आहे हे लक्षात येताच त्यांनी सरिताला सक्त ताकीद दिली. एकही तक्रार यापुढे आली तर तिला व तिच्या मुलाला घरी प्रवेश करण्यास मनाई करू, असे सांगितले.
रोहिणीला तिच्या नातेवाईक, मित्रांना घरी बोलावता येईल; पण सरिताला मात्र रोहिणीची परवानगी असेल तरच अन्य व्यक्तींना घरात बोलावता येईल, असे आदेश देत पोलिसांनाही रोहिणीला जेव्हा हवे तेव्हा संरक्षण देण्याचे आदेश दिले. १६ जून रोजी या प्रकरणी न्यायालय पुढील सुनावणी घेणार आहे.