मोखाडा : जव्हार तालुक्यातील काळशेती या गावात अशोक तराळ (६) या बालकाचा मृत्यू झाला असून, त्याची बहीण रोशनी तराळ (३) जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये कोणीतरी ‘थायमेट’ ही विषारी पावडर मिसळल्यामुळे अशोकचा मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विनायक तराळ हे कामानिमित्त बाहेरगावी असतात, तर त्यांच्या पत्नी व मुले मौजे काळशेती येथे राहतात. मुलांना घरी ठेवून त्यांची पत्नी शेतीच्या कामावर गेली होती. संध्याकाळी ५.३० ते ६च्या दरम्यान ती घरी आली असता मुलगा अशोक आणि मुलगी रोशनी तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत आढळले. त्या दोघांनाही जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी अशोकचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर रोशनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जव्हार कॉटेजचे वैद्यकीय अधिकारी संदीप मुकणे यांनी दिली. पिण्याच्या पाण्यामध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक थायमेट ही विषारी पावडर मिसळल्याने व तेच पाणी मुलांनी प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
जव्हारमध्ये पाण्यातून विषबाधेने बालकाचा मृत्यू
By admin | Published: November 05, 2014 4:40 AM