पोलिसांत तक्रार : गोबरवाहीकडे पोलीस चमू रवानाभंडारा : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातून बाळाची अदलाबदल झाल्याची घटना सोमवारला सायंकाळी ५ वाजता अतिदक्षता विभागात उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी सामान्य रूग्णालय प्रशासनाने भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस व डॉक्टरांची चमू गोबरवाहीकडे रवाना झाली आहे.भंडारा येथील सीमा अमर उके या महिलेची १४ जुलै रोजी प्रसुती झाली. तिला मुलगा झाला. परंतु बाळ जन्मल्यानंतर रडत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता कक्षात दाखल केले. त्याच कालावधीत गोबरवाही येथील बबीता उईके या महिलेची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. तिच्याही मुलीचे वजन कमी असल्यामुळे तिलाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. दरम्यान १६ जुलै रोजी बबिताच्या मुलीची सुटी झाल्यामुळे तिला बाळ देण्यात आले. बाळ देताना ऊईकेना मुलगा देण्यात आला. परंतु आपल्याला मुलगी झाल्याचे माहित होऊनही मुलगा देण्यात आल्यामुळे ऊईके दाम्पत्य मुलाला घेऊन गोबरवाहीला रवाना झाले. दरम्यान आज सोमवारला सायंकाळी सीमा उके या बाळाला बघण्यासाठी गेली असता तिला मुलगी दाखविण्यात आली. त्यानंतर तिला धक्का बसला. ही माहिती तिने पती अमर उके यांना दिल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस, डॉक्टरची चमू गोबरवाहीकडे रवाना झाली आहे.