बदलापूर- खंडणीसाठी आपल्याच मालकाच्या मुलाचं अपहरण करण्याचा डाव फसल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. 7 वर्षाच्या अरुषचं अपहरण करताना आरोपीने त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्याच्या तोंडाला क्लोरोफॉम लावल्याने मुलाच्या चेहऱ्याला इजा झाली आहे. क्लोरोफॉर्ममुळे त्या मुलाचा चेहरा विद्रुप झाला आहे. बदलापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अपहरणकर्त्याला अटक केली आहे.
अरुष परब या मुलाचं बदलापुरातील गोपाळ हाईट्स या इमारतीतच राहणाऱ्या सुनील पवार यांनी अपहरण केलं. अरूषला बेशुद्ध करण्यासाठी आरोपीने क्लोरोफॉमचा वापर केला .क्लोरोफॉर्ममुळे अरुषचा चेहरा हा काळा नीळा पडला आहे.
अरूष हा बदलापुरातील शेखर परब या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अरूष हा इमारतीखाली खेळत होता. बराच वेळ तो घरी आला नाही म्हणून अरूषची मावशी आणि बहीण त्याला शोधायला इमारतीखाली आल्या होत्या. बराच वेळ शोध घेतल्यानंतर इमारतीच्या मागच्या भागात एका रिक्षात अरुषला कोणीतरी तोंड दाबून ठेवल्याचं त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाकडून अरूषला ओढून त्याची सुटका केली.
शेखर परब यांच्याकडे गेल्या 20 वर्षापासून काम करणाऱ्या महादेव पवार या व्यक्तीने अरूषचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. अरूषबरोबर खेळण्याचा बहाणा करून आरोपीने अरूषला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीच्या तावडीतून सोडविलेल्या अरूषला घरी नेल्यावर त्याचा चेहरा निळसर आणि लाल पडू लागला. डॉक्टरांकडे नेल्यावर त्याच्या तोंडाला क्लोरोफॉर्म लावण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर सुनिल अरूषचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं.
अरुषच्या कुटुंबाने बदलापूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुनिलच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुनिलने पैशासाठी अरुषचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. मात्र त्याला क्लोरॅफार्म कसा मिळाला त्याचा कोणी साथीदार आहे का याचा आता पोलीस शोध घेत आहेत.