श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : स्मशानभूमीच्या जागेवरुन दलित समाजातील महिलेचा अंत्यविधी रोखण्यात आल्याने तालुक्यातील चिंभळे येथे तणाव निर्माण झाला होता. आमदार बबनराव पाचपुते, तहसीलदार अनिल दौंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर तणाव निवळून महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मातंग समाजातील लक्ष्मीबाई मल्हारी आढागळे (वय ७५) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी स्मशानभूमीत अंत्ययात्रा येताच एका गटाने स्मशानभूमीच्या जागेवरुन हरकत घेऊन अंत्यविधी करुन देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर दलित समाजातील नागरिकांनी तहसीलदारांकडे धाव घेऊन कैफियत मांडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार पाचपुते, तहसीलदार दौंडे यांनी चिंभळे गावाला भेट देऊन दोन्ही गटात मध्यस्थी केली. शनिवारी दुपारी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)--------------------------------प्रशासन उदासीनस्मशानभूमीच्या जागेवरुन मातंग समाजातील महिलांनी यापूर्वी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र प्रशासनाने अजुनही ठोस भूमिका न घेतल्याने स्मशानभूमीचा वाद उफाळला आहे. ---------------------------------
अंत्यविधी रोखल्याने चिंभळेत तणाव
By admin | Published: May 04, 2014 11:54 PM