ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. ९ - घरातील गणेशोत्सवाला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईतील तारेमुळे विजेचा धक्का बसल्याने वैष्णवी बसवराज झेंडे (वय ६ वर्षे, रा. हनुमाननगर, सांगली) ही चिमुरडी ठार झाली. शुक्रवारी ही घटना घडली.
गणपतीची आरती करीत असताना, सर्वांच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने या कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
झेंडे कुटुंबाने गणपतीची प्रतिष्ठापना लाकडी टेबलवर केली आहे. टेबलभोवती विद्युत रोषणाईची माळ लावली आहे.
शुक्रवारी हे कुटुंब गणपतीची आरती करीत होते. वैष्णवीही आरतीत सहभागी होऊन टाळ्या वाजवित होती. सर्वजण आरतीत मग्न असताना वैष्णवी टाळ्या वाजवत मूर्तीजवळ गेली. टेबलवरील विद्युत रोषणाईच्या माळेला तिने हात लावला. यातून तिला जोरात विजेचा धक्का बसला.
ती उडून पडताना कुटुंबाने तिला उचलून घेतले व विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, पण तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने डॉक्टरांनी तिला शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. रुग्णालयात आणण्यापूर्वी वाटेतच तिचा मृत्यू झाला.
वैद्यकीय अधिका-यांनी तिला मृत झाल्याचे घोषित करताच कुटुंबाने आक्रोश सुरू केला. वैष्णवीच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. तिचे वडील प्रज्ञा प्रबोधिनी शाळेजवळील मारुती मंदिराजवळ फुलांच्या हार विक्रीचा व्यवसाय करतात.
दुसरा बळी
घरगुती गणेशोत्सवात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचा धक्का बसल्याने गेल्या चार दिवसात दोघांचा बळी गेला आहे. खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सांगलीत वैष्णवी झेंडे या चिमुरडीचा बळी गेला आहे.