नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भामेर शिवारात शनिवारी (दि.२१) संध्याकाळी एका चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून जंगलात नेल्याची घटना घडली. रात्रभर गावकरी सर्वत्र मुलाचा शोध घेत होते. सकाळच्या सुमारास परिसरातील एका जंगलात मुलाचे शीर आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून या भागात मेंढपाळ नेहमी मुक्कामी असतात. एका मेंढपाळाच्या पडाव असलेल्या राहूटीमधून वडीलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले. यानंतर गावातील नागरिकांनी रात्रभर सर्वत्र शोध घेतला; मात्र मुलगा आढळून आला नाही. दरम्यान, सकाळी काही लोक जंगलात शोधण्यासाठी गेले असता त्यांना मुलाचे शीर मिळून आले. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. या भागात तत्काळ पिंजरे लावण्यात येणार असून मेंढपाळ कुटुंबियांना शासकिय नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा नाशिक-पुणे महामार्गावर मृत्यू तसेच दुसर्या घटनेत संध्याकाळी सिन्नर जवळील मोहदरी घाटात नाशिक-पुणे महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्या बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सुमारे साडेतीन वर्षांचा नर जातीचा बिबट्या या अपघातात मृत पावला. यावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वनविभागाचे अधिकार्यानी तातडीने घटनास्थळ गाठले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, वनपाल अनिल साळवे, प्रितेश सरोदे, पोपट बिन्नर आदिंनी स्पॉट पंचनामा केला. आज सकाळी पशुवैद्यकिय अधिकाºयांनी शवविच्छेदन करून वनविभागाच्या कर्मचार्यानी मोहदरी वनोद्यानात मृत बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.