रविकिरण सासवडे,
बारामती- चिमणा-चिमणीची जोडी आपल्या होणाऱ्या पिलांसाठी शाळेच्या वर्गात घरटे बांधू लागतात... वर्गातील चिमुकले चिमणा-चिमणीची ही लगबग कौतुकाने बघत असतात, मात्र सिमेंटच्या बांधलेल्या वर्गखोल्यांमध्ये या इवल्याशा जिवांचे घरटे बांधण्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. शेवटी वर्गातील चिमुकल्यांनीच या चिऊताईसाठी छानसे घरटे तयार केले व वर्गामध्ये टांगले. या चिमणा-चिमणीच्या जोडीनेही चिमुकल्या दोस्तांनी केलेल्या घरट्यात आपला संसार थाटला, तसं या चिमुकल्यांनीही आनंदाने टाळ््या पिटल्या.शेळगाव-महादेवनगर (ता. इंदापूर) भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हा सुखद अनुभव. एरवी पर्यावरणावर केवळ बौद्धिक घेणाऱ्यांना या चिमुकल्यांच्यां कृतीतून सणसणीत उत्तर मिळाले. या शाळेतील छोट्या दोस्तांची कृती तशी साधीच, दररोजच्या दैनंदिन जीवनात पशूपक्ष्यांच्या अशा मूलभूत गरजांकडे किती जणांचे लक्ष जाते, म्हणूनच या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची कृती कौतुकास पात्र आहे. आपल्या वर्गात चिमणी घरटे करते, म्हटल्यानंतर वर्गातील चिमुरडे भलतेच खुश झाले होते. दररोज त्या चिमणा-चिमणीच्या जोडप्याची घरटे बांधण्याची लगबग डोळ््याने ते टिपत होते. परंतु सिमेंटच्या छान रंगवलेल्या वर्गखोल्यांमध्ये चिमणा-चिमणीला घरटे करण्यासाठी योग्य जागा मिळाली नाही. घरटे करण्यासाठी चिऊताई तोंडात काडी घेऊन वर्गभर घिरट्या घालीत असे. वर्गात एखाद्या ठिकाणी चिऊताईने घरटे विणायला घेतले, की अल्पावधीतच घरट्याचा सारा सांगाडा खाली कोसळे. चिऊताईच्या या प्रयत्नांचे चिमुरड्यांनाही भारी कौतुक वाटत असे. चिऊताईचे प्रयत्न निष्फळ ठरले. आता चिऊताई आपल्या वर्गात राहणार नाही, त्यामुळे सारी मुले हिरमुसली. >या वेळी वर्गशिक्षक असलेल्या नितीन मिसाळ यांनी, ‘आपण बनवू चिऊताईसाठी घर’ असे सांगताच वर्गातील लहानगी फौज कामाला लागली. शाळेतच पडलेले टाकाऊ सामान गोळा केले. एका पाइपपासून छान घरटे बनवले गेले. त्याला नाव दिले ‘चिऊताईचे घरटे,’ हे घरटे जेव्हा वर्गाच्या छताला अडकवले व एक-दोन दिवसांनंतर चिऊताईने ते स्वीकारले तेव्हा कोमल जाधव, निकिता जाधव, श्रुती ननावरे, सूरज अवघडे, अनुष्का जाधव, ओम शिंदे या विद्यार्थ्यांना आनंद झाला.