- मनीषा म्हात्रे
- चिमुरडी वीस दिवसांपासून होती बेपत्ता
मुंबई, दि. 25 - गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३ वर्षांच्या चिमुरडीचा शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुकडे केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. चिमुरडी गायब झाल्यानंतर तिच्या कुटुंबियाना १ कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. अशात पैसे दिले नाही म्हणून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण ह्त्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
भायखळा येथील कामाठीपुरा परिसरात ३ वर्षांची नेहा ( नाव बदलले आहे) कुटुंबियांसोबत राहत होती. तिच्या कुटुंबियांचा भंगारचा व्यवसाय असून गेल्या ५ डिसेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना ती अचानक गायब झाली. त्यानंतर येथील हाऊस गल्लीमध्ये तिची चप्पल मिळाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर, कुटुंबीयांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शोध सुरु केला.
नेहाच्या चप्पलवरुन शोध सुरु होता. त्यानंतर काही दिवसांने तिच्या कुटुंबियांना १ करोड रुपयांच्या खंडणीसाठी कॉल आला आणि पैसे द्या अन्यथा तिचे तुकडे करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. दरम्यान, या कॉलच्या आधारे शोध सुरु असतानाच शनिवारी रात्री साडे बाराच्या सुमारास कामाठीपुरा येथील मौलाना आझाद रोडवर असलेल्या शरबत चाळ इमारतीच्या टेरेसवर नेहाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुरडीच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहाच्या वडिलांची कार पाहून आरोपींनी तिच्या अपहरणाचा डाव रचला. यानंतर तिच्या कुटुंबियांकडे एक करोड रुपयांची मागणी केली. त्यानंतर 28 लाख देण्यावर तयार झाल्याचे समजते. तसेच, हत्या करण्यामागे नेहाच्या घरा शेजारी राहणा-या व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून याप्रकरणी जे. जे .मार्ग पोलीस अधिक तपास करत आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला आहे की नाही हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.