चंद्रपूर : वर्गात फळ्यावर दिलेले गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षिकेने केजी-२ च्या पाच वर्षाच्या मुलीला केस पकडून जबर मारहाण केली. ही घटना येथील माऊंट कार्मेल अकॅडमी स्कूल येथे मंगळवारी घडली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला असून शाळेनेही तिला सेवेतून निलंबित केले आहे.मुलांना शाळेची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण द्यावे, असा शासनाचा नियम आहे. मात्र, शिक्षिका मल्लिका सरकार यांनी गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून संतापून चिमुरडीचे केस पकडून जबर मारहाण केली. शिवाय, डोक्यावरील केस उपटले. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी गेली. आईचे लक्ष मुलीच्या केसांकडे गेले. विचारपूस केली असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला सदर प्रकरणाची माहिती दिली. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला बोलावून चौकशी केली असता मारहाण केली नाही, असा दावा तिने केला. त्यामुळे पालकांनी शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयातील फुटेज दाखविण्याची मागणी केली. फुटेज बघितले असता, आई-वडिलांना धक्काच बसला.मुलीच्या आई मीनाक्षी सरकार यांनी तडक रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम ३२३ नुसार अदखल पात्र गुन्हा नोंदविला आहे.शिक्षिका निलंबितविद्यार्थिनीला मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आल्यानंतर शिक्षिका मल्लिका सरकार यांना शाळेतून निलंबित करण्याचा निर्णय सायंकाळी उशिरा शाळा व्यवस्थापनाने घेतला.विद्यार्थ्यांना मारहाण करु नये, असे शिक्षिकांना सांगण्यात आले आहे, तरी ही मारहाणीची घटना घडली. त्यामुळे दोषी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.- सिस्टर नित्या, मुख्याध्यापिका, माऊंट कार्मेल अकॅडमी, चंद्रपूर
गृहपाठ न केल्याने चिमुरडीला जबर मारहाण, व्हिडीओ व्हायरल : शिक्षिकेवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 3:10 AM