मुंबई : मुंबईमधल्या शाळांमधील ७७ विद्यार्थी कलाकारांचे ‘यलो कॅनव्हास २०१६’ हे कलाप्रदर्शन कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६ नरिमन पॉइंट येथे मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन २५ ते ३० एप्रिल या काळात सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत पाहाता येईल. हे प्रदर्शन सर्व कलारसिकांना विनामूल्य पाहता येईल. प्रदर्शनाचे निर्देशक सोहन कुमार या प्रदर्शनाविषयी म्हणाले, की स्पर्धाविरहीत वातावरणात मुलांच्या प्रतिभेला अधिक बहर येतो. कलानिर्मितीचा आनंद अनुभवणारी बच्चेकंपनी या दरम्यान पाहता आली. ‘यलो कॅनव्हास २०१६’ या प्रदर्शनात ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले. लॅँडस्केप, पोट्रेट, स्टील लाइफ, प्राणी, वनस्पती आणि पशुवर्गाचे जीवन असे अनेक विषय इथे हाताळले आहेत. जलरंग ते अॅक्रेलिक अशा रंगांचा वापर बालकलाकारांनी केला. समाजातील अनेक दिग्गज मान्यवरांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले असून, गायक अभिजित भट्टाचार्य यांनी चित्रकला ही मुलांना त्यांची कल्पनाशक्ती व्यक्त करण्यासाठीचे एक नैसर्गिक साधन आहे, असे म्हटले आहे. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी आॅफ इंडिया आणि संस्कार भारतीचे अध्यक्ष वासुदेव कामत व बाल अभिनेता दर्शील सफारी यांनी देखील सहभागी कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
चिमुरड्यांनी साकारला ‘यलो कॅनव्हास’
By admin | Published: April 26, 2016 3:01 AM