मुंबई : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य हेन झेंग यांनी आज शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासंदर्भात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई व शांघाय शहरांमधील सिस्टर सिटी मैत्री कराराची अंमलबजावणी पुढे सुरू ठेवण्यासंदर्भातही चर्चा झाली.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत झेंग यांच्यासह चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री चेन फेनझंिग, शांघायचे उपमहापौर झोऊ बा तसेच राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, शांघायमधील भारताचे कौन्सिल जनरल प्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, शांघायमधील उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, यासाठी कम्युनिस्ट पार्टी आॅफ चीनने तेथील कंपन्यांना प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे. आम्ही या कंपन्यांचे स्वागत करून त्यांना सर्व सहकार्य करू. जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक, उत्पादन निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करावी. भारतामध्ये बॉलिवूडचे महत्व मोठे आहे. बॉलिवूडचा महत्त्वाचा आयफा पुरस्कार वितरण कार्यक्र म लवकरच शांघाय येथे होणार आहे. शांघायवासीयांना तसेच चीनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी ही एक पर्वणी असेल. त्या कार्यक्र मासाठी चीन शासनाने व कम्युनिस्ट पक्षाने सहकार्य करावे.झेंग म्हणाले की, महाराष्ट्रातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे कार्य चीनमधील जनता अजूनही विसरली नाही. त्यामुळे महाराष्ट्राबरोबर सहकार्य करण्यात आम्हाला आनंद आहे. शांघाय व मुंबई या दोन्ही शहरांमध्ये खूप साम्य असून ही दोन्ही शहरे त्या त्या देशाची वित्तीय व आर्थिक केंद्रे आहेत. या दोन्ही शहरांमध्ये झालेला मैत्री कराराच्या पुढच्या टप्प्यासाठी कम्युनिस्ट पार्टी सर्व मदत करेल. मुख्यमंत्र्यांना त्यांनी शांघाय भेटीचे निमंत्रण दिले. ते मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले. (विशेष प्रतिनिधी)
दुष्काळ निवारणासाठी चीनचा मदतीचा हात
By admin | Published: May 10, 2016 4:02 AM