दासगाव/महाड : भारताच्या उरी सैनिकी तळावर अतिरेकी हल्ला प्रकरणानंतर भारतात पाकिस्तानबाबत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या पाकिस्तानला नकळत सहाय्य करणाऱ्या चीनवर देखील भारतीय नागरिकांनी आपला असंतोष सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. व्हॉट्सअॅपवर तर चिनी वस्तू खरेदी करू नका, असे आवाहन करणाऱ्या पोस्ट अनेक ग्रुपवर दिसून येत आहेत.चिनी वस्तूंनी संपूर्ण भारतीय बाजारपेठ कधीच काबीज केली आहे. अनेक चिनी खेळणी, वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ मानवी आरोग्यास घातक असल्याचे सिद्ध झाले आहे.
यामुळे मध्यंतरी चिनी मालावर बंदी घालण्यात आली. असे असले तरी भारतात आजही चिनी वस्तू बाजारपेठेत सहज उपलब्ध होत आहेत. भारतातील प्रत्येक सण उत्सवातील विविधता चिनी मालाने टिपली असून सण उत्सवात लागणाऱ्या वस्तू देखील चीनमधून आयात होत आहेत. यामध्ये दिवाळीला लागणारे फटाके, विविध कंदील, स्वस्तातील विजेच्या माळा, पणत्या, दसऱ्यातील देवीचे मुखवटे, ख्रिसमसमधील वस्तू सहज उपलब्ध होत आहेत. भारतीय उत्पादनापेक्षा विविधता असलेले आणि दराच्या मानाने खूपच स्वस्त असलेल्या या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
यूज अॅन्ड थ्रो या भूमिके मुळे भारतीय बाजारपेठ चिनींनी काबीज केली आहे. या वस्तू चीनमधील प्लास्टिक तसेच इतर कचऱ्यापासून देखील बनविल्या जात आहेत. चिनी वस्तूंची आयात इथेच थांबली नाही मोठ्या इंडस्ट्रीमध्ये देखील चिनी माल सहज आणि भारतीय उत्पादनापेक्षा कमी दरात उपलब्ध आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवू पाहणारे या मालाला पसंती देत आहेत. यामुळे भारतातील अनेक कारखाने बंद पडू लागले आहेत. महाड एमआडीसीतील काही कारखाने या चिनी मालामुळे बंद पडल्याची उदाहरणे आहेत.