- ऑनलाइन लोकमत
थेऊरला द्वारयात्रेची सांगता : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
लोणी काळभोर, दि. 6 - श्रीगणेश चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रींच्या मूर्तीला अलंकारयुक्त पारंपरिक पोशाख घालण्यात आल्यानंतर मूर्तीचे सौंदर्यात भर पडली होती. गेले चार दिवस सुरू असलेल्या द्वारयात्रेची सांगता आज झाली.
आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी विद्याधर आगलावे यांनी विधिवत महापूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. आज भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. चिंचवड देवस्थानच्या वतीने सकाळी सात वाजता ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे यांचे उपस्थितीत मोरेश्वर पेंडसे यांनी महापूजा केली.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा (दि.२) पासून थेऊर येथील प्राचीन परंपरेप्रमाणे द्वारयात्रेची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कोरेगाव मूळ येथील ओझराईमाता, दुसºया दिवशी आळंदी म्हातोबाची येथील आसराईमाता, तिसºया दिवशी मांजरी येथील मांजराईमाता, तर आज गणेश चतुर्थीच्या दिवशी थेऊर येथील ग्रामदैवत महातारी माता येथे गेली होती. पूर्वापार चालू असलेल्या प्रथेप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये पूजा करून नैवेद्य दाखवल्यानंतर महान साधू मोरया गोसावी यांची पदे गावून आरत्या करण्यात आल्या. पिरंगुटकर देव मंडळी व रहिवासी या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. त्याला स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
श्री चिंतामणीस दुपारनंतर अलंकारयुक्त पारंपरिक पोशाख घालण्यात आला होता. मंदिर परिसरात आगलावे बंधूंच्या वतीने आकर्षक रंगीत दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वेगळीच अनुभूती आली. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या कालावधीत मंदिरात रोज सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळ, थेऊर हे संगीत भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
श्री चिंतामणीस आज दुपारनंतर अलंकारयुक्त पारंपरिक पोशाख घालण्यात आला होता.
मंदिर परिसरात आगलावे बंधूंच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक रंगीत दिव्यांची विद्युत रोषणाई