मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार होते. मात्र अगदी ऐनवेळी या सोहळ्यात ऑनलाइन सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला, अशी कुजबुज आहे. शिंदे भाषणात बोलले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते त्यात एकीकडे पेशवे होते तर दुसरीकडे शिंदे, होळकर होते. त्यांनी मिळून ब्रिटिश, पोर्तुगीज यांच्या फौजांशी सामना केला. मात्र प्रत्यक्षात चिपीत एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मधोमध आपल्याला बसवले जाणार. राणे व ठाकरे परस्परांवर टीकास्त्र सोडणार व व्यासपीठावर बोलताना आपण दोघांपैकी कुणाहीकडे झुकलो तर दुसरा नाराज होणार. त्यामुळे सिंदिया यांनी राज्यातील एका मातब्बर मंत्र्याला विनंती करून ऑनलाइन सहभागाची विनंती केली. शिंदे यांची अडचण ओळखून मग त्यांच्या दिल्लीतून सहभागाची विनंती मान्य केली. ठाकरे-राणे यांच्यात पोलिटिकल डिस्टन्सिंग राखून मधोमध भली मोठी समई लावण्याची शक्कल ज्याने लढवली त्याच्या कल्पनेला खरोखरच दाद दिली पाहिजे.
ईडी, आयटी छाप्यांचा परिणाम !बऱ्याच मंत्री कार्यालयांमध्ये सध्या जरा भीतीचं वातावरण बघायला मिळतं. काही मंत्र्यांचे पीए, पीएस, स्टाफमधील कर्मचारी मोबाईलवर बोलताना सांभाळूनच बोलतात. काहीजण सुरक्षित पर्याय म्हणून व्हॉट्सॲपवर बोलतात. व्हॉट्सॲप मेसेजेस लगेच डीलीट करण्याची काळजी घेतात. मध्येच कोणीतरी सांगतं की, व्हॉट्सॲप कॉलपण सुरक्षित नसतात, त्यांचंही रेकॉर्डिंग केलं जातं. त्यापेक्षा ॲपल फोन घेऊन फेसटाईमवरून कॉल करा. फेसटाईमवर कॉल बरेच दिवस केल्यानंतर हळूच कोणीतरी सांगतं की, तेही सुरक्षित नाही. मग कुठून तरी कोणीतरी सल्ला देतं की, बाबा रे, टेलिग्राम हा ॲप डाऊनलोड करून घे अन् त्यावरून बोलत जा! त्यावरून कॉल केला तर त्याचे रेकॉर्डिंग होत नाही. या ईडी अन् आयकर खात्याच्या छाप्याचा हा परिणाम दिसतो. मोबाईलवरून बोलणंच सुरक्षित नाही, ‘गड्या आपला गाव बरा’सारखं ‘गड्या आपला लँडलाइन बरा’ असा सल्ला मग कुणीतरी देतं, मग लँडलाइनचा आधार घेणं सुरू होतं. काय दिवस आलेत बघा! (या सदरासाठी यदु जोशी, संदीप प्रधान यांनी लेखन केले आहे. श्रेयनामावली मजकुराच्या क्रमानुसार असेलच असे नाही.)