ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - पुणेकरांच्या स्वभावाचे वर्णन करण्यासाठी अनेकदा चितळे बंधूंचे उदाहरण दिले जाते. याच दुकानाच्या वेळेवरून सोशल मीडियावर अनेक विनोदही तयार झाले होते. परंतु आता हे सर्व थांबणार आहे.
दुपारच्या वेळात बंद असणारं चितळे बंधू यांचं दुकान 1 जुलैपासून दुपारीही सुरू राहायला सुरूवात झाली आहे. दुपारी 1 ते 4 यावेळेत बंद राहणारे चितळे बंधू याचे डेक्कन येथील दुकान दुपारी 1 ते 4 या वेळेतही ग्राहकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. पण देशात सर्वत्र एक करप्रणाली अर्थात जीएसटी लागू झाल्याचा परिणाम येथेही पाहायला मिळत आहे. या दुकानातील बाकरवडीसह इतर खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. चितळेंचं डेक्कनमधलं दुकान सकाळी 9 ते 8.30 पर्यंत सुरु राहिलं, असा बोर्ड चितळेंच्या दुकानाबाहेर लावण्यात आला आहे.
जीएसटीमुळे ग्राहकांना एरवी 280 रुपये किलोने मिळणा-या बाकरवडीची किंमत आता 300 रुपये इतकी झाली झाली आहे.
चितळे बंधू मिठाईवालेचे संचालक इंद्रनील चितळे यांनी काही महिन्यापूर्वी ठाण्यातील एका कार्यक्रमात पुण्यातील एक दुकान दुपारच्या वेळेतही सुरू ठेवणार आहे, अशी माहिती दिली होती.