मुंबई - विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. परंतु, हा पेच आता सुटताना दिसत आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांचीही प्रतिक्रिया आली आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात मेगा भरती झाली होती. त्याच मेगाभरतीत चित्रा वाघ देखील होत्या. त्यावेळी वाघ यांच्याकडे राष्ट्रवादीमध्ये महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती.
युती करून लढलेल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र 50-50 च्या फॉर्म्युल्यावरून भाजपने भूमिका बदलल्यामुळे अखेर शिवसेनेने युतीसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. तर शिवसेना सोबत येणार नसल्यामुळे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या भूमिकेवर चित्रा वाघ म्हणाल्या की, भाजपने घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. सत्तेपेक्षा तत्व महत्त्वाचे असंही वाघ म्हणाल्या. भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणून मी भाजपमध्ये आले. लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्यांच्या समस्या सोडवून दाखवेन. मी कुठेही पळून गेलेली नाही. मी गद्दार नाही. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून मी पक्ष सोडल्याचा दावा चित्र वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी सांगितले होते.