मुंबई : अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकसान झालेल्या भागात जाऊन ते शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत आहे. याचवेळी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याने फडणवीस यांना चक्क चॉकलेट भेट दिली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही ते चॉकलेट आनंदाने स्वीकारले.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि मंत्री शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रविवारी अकोला जिल्ह्यातील काही भागात दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजवून घेतल्या.
अकोल्यातील म्हैसपूर येथील शेतकऱ्यांना भेटून फडणवीस परत निघाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा दरवाजा बंद झाल्यावर गोपाल रायकर नावाचा शेतकरी गाडीजवळ आला. त्यावेळी त्याने फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या खिशातून लहानसं चॉकलेट बाहेर काढून गाडीच्या काचेजवळ धरलं. ही बाबा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सुद्धा गाडीचा दरवाजा परत उघडत शेतकऱ्याची भेट आनंदाने स्वीकारली.
तसेच कोरड्या दुष्काळाप्रमाणे हा ओला दुष्काळ आहे.गेल्या 14 दिवसांपासून पाऊस पडत आहे आणि पुढे आणखी काही दिवस पडणार आहे. त्यामुळे हेल्पलाईन सर्वत्र सुरु करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. जितकी जास्त मदत करता येईल तितकी केली जाईल. त्यासंदर्भात काम सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.