मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक आज विधिमंडळात एकमताने पारित झाले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया देताना ''चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदलले आहे,'' असे म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अहवाल राणे समितीने सादर केला होता, हा अहवाल उच्च न्यायालयाने रद्द केला नव्हता. तर राज्य सरकारने उच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नव्हती, असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला. ''चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदलले आहे'', असे सांगत फडणवीस सरकारने जाहीर केलेले आणि आज पारित झालेले आरक्षण हे राणे समितीने दिलेल्या अहवालासारखेच आहे, असे सांगण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, नारायण राणे यांनीही मागासवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय असल्याचा दावा केला आहे. बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभ पटलावर मांडलं. मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजुरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर, मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.
चॉकलेट सेम, केवळ रॅपर बदलले, मराठा आरक्षणावरून नितेश राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 4:43 PM