मुंबई : मेट्रो-३च्या आरे कॉलनीतील प्रस्तावित कार डेपोकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने त्याला झालेल्या प्रखर विरोधानंतर याबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असून, त्यामध्ये आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग येथील जागेचा पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय स्वीकारल्यास प्रकल्पाचा खर्च ७५० कोटी रुपयांनी वाढणार असून, सध्या कांजूरमार्ग येथील जमिनीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या समितीत एमएमआरडीएचे आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, आयआयटी मुंबईचे प्रोफेसर डॉ. श्याम आसोलेकर आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक एस. डी. शर्मा यांचा समावेश होता.या अहवालात म्हटले आहे की, कांजूरमार्ग-जोगेश्वरी कॉरिडॉर आणि कार डेपो यांचे बांधकाम करताना पर्यावरणाची हानी होऊ नये याकरिता ७५० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे मार्गिका-३ या टप्प्याचे काम करताना ते कुलाबा-सिप्झ कॉरिडॉर आणि जोगेश्वरी-कांजूरमार्ग कॉरिडॉर यांच्याशी एकीकृत करावे. याकरिता सरकारने तीन महिन्यांच्या कालावधीत कांजूरमार्गमधील जमीन प्रकल्पाला दिल्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ला पुढील काम करणे सोपे होईल, असे सुचवले आहे. (विशेष प्रतिनिधी)कांजूरमार्ग येथील ज्या जमिनीवर प्रस्तावित कार डेपो आहे त्या जमिनीबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे एमएमआरडीएमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. आरे कॉलनीतील त्याच जागेवर आवश्यक असणाऱ्या केवळ १६ स्टॅबलिंग लाइन्स बांधण्यात याव्यात. यामुळे आर्थिक भार वाढणार नाही आणि २ हजारऐवजी ५०० वृक्षांचीच कत्तल करावी लागेल. कार डेपोचा परिसर मात्र ३० हेक्टरवरून २०.८२ हेक्टर इतका कमी होईल, असा पर्यायही समितीने सुचवला आहे.
मेट्रो-३ कार डेपोसाठी कांजूरमार्गचाही पर्याय
By admin | Published: October 10, 2015 2:26 AM