कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४२व्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अश्विनी रामाणे यांची, तर उपमहापौरपदी शमा मुल्ला यांची निवड निश्चित मानली जाते. तर दुसरीकडे आवश्यक संख्याबळापर्यंत पोहोचण्यासाठी काही मोजक्याच मतांची गरज असल्याने भाजपा-ताराराणी आघाडी देखील महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्यास सज्ज झाली आहे.नगरसेवक फुटीचा धोका पत्करावा लागू नये म्हणून शनिवारी सायंकाळी कऱ्हाड, कोयना जलाशयाकडे सहलीवर गेलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ४२ नगरसेवक सोमवारी सकाळी कोल्हापुरात पोहोचतील. सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात महापौर व उपमहापौरांची निवड जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला २७, राष्ट्रवादीला १५, ताराराणीला १९, भाजपला १३, शिवसेनेला चार जागा मिळाल्या, तर तीन जागांवर अपक्षांना संधी मिळाली. दोन अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ ४४ पर्यंत पोहोचले आहे. काँग्रेसकडून महापौरपदासाठी अश्विनी रामाणे, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.भाजप-ताराराणी महायुतीतर्फे महापौरपदासाठी सविता भालकर, तर उपमहापौरपदासाठी राजसिंह शेळके यांचे उमेदवारी अर्ज ठेवून इतर अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
कोल्हापूरच्या महापौरांची निवड आज
By admin | Published: November 16, 2015 3:31 AM