अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गुणवत्तावाढीचा नवीन उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शाळांमध्ये गुणवत्तावाढीचा उपक्रम राबविण्यात येईल. शाळा निवडीची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली.राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेले राज्यस्तरावरील सर्वेक्षण आणि विविध संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१५-१६ या वर्षात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नवीन उपक्रमामध्ये निवडक शाळांना गुणवत्तावाढीसाठी विशिष्ट कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळामार्फत आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गुणवत्तावाढीसाठी शाळांची निवड करण्याचा निर्णय २१ एप्रिल रोजी घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ४०८ गट आणि शहर साधन केंद्रांच्या समूह साधन केंद्रांतर्गत शाळांची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गुणवत्तावाढीसाठी शाळांची होणार निवड
By admin | Published: May 02, 2015 1:10 AM