पुणे : शेतीसाठी उपलब्ध जमिनीच्या तुलनेत त्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या खूप मोठी आहे. शेती किफायतशीर न राहिल्याने तरुण उदासीन होत असून, शेती करणे सोडत आहेत. त्यामुळे शेतीवरील भार कमी करण्यासाठी इतर पर्याय शोधण्याची गरज आहे. आता शेतीपूरक जोडधंदे, प्रक्रिया उद्योग, व्यवसायाकडे वळायला हवे. शेती एके शेती न करता अर्थकारण बदलण्यासाठी वेगळे मार्ग निवडण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. अॅक्शन फॉर अॅग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र (अफार्म) या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (दि. १) आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार श्रीनिवास पाटील,अफार्म चे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी, व्हॉलेन्टरी अॅक्शन नेटवर्क इंडिया (वाणी) या संस्थेचे हर्ष जेटली, वसुधा सरदार आदी उपस्थित होते. यावेळी अफार्मच्या स्मरणिकेचे प्रकाशन व संकेतस्थळाचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.पवार म्हणाले, की देशामध्ये शेतीवर ६५ टक्के लोक अवलंबून आहेत. या लोकसंख्येचा भार सोसण्याची ताकद शेतीत राहिली आहे का? सर्वांनी शेतीच केली तर ती किफायतशीर ठरणार नाही. एकीकडे लोकसंख्या वाढत असताना जमीन मात्र तेवढीच आहे. उलट औद्योगिकीकरण, नागरीकरण, रस्ते यांसह विविध विकासकामांमुळे शेतीयोग्य जमीन कमी झाली आहे. हा विकास चुकीचा नाही. पण, शेतीवरचे अवलंबवित्व आता कमी व्हायला हवे. कुटुंबाचा आर्थिक प्रश्न सोडवायला शेती अपुरी पडतेय. शेताशिवाय व्यवसायाची इतर दालने खुली केली तर अर्थकारण बदलू शकेल. मर्यादित हातांना उत्तम शेती करता येईल. शेती उत्पादन वाढण्याची गरज असली, तरी त्यासाठी वेगळे मार्गही आहेत. केवळ पीक न काढता इतर पूरक व्यवसाय, उद्योगांचाही विचार करण्याची वेळ आली आहे. ह्यअफार्मह्णसारख्या संस्थांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगळ्या दिशेने जायला हवे, असे पवार यांनी नमूद केले. पाटील यांनी शेतीमाल साठवणूक व विक्रीची सक्षम साखळी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.
ग्रामविकास संस्कृती निर्माण व्हावीहिवरे बाजार गाव बदलून जाते. पण, त्या गावाशेजारील इतर गावांमध्ये विकास होत नाही. त्यासाठी ग्रामविकासाची संस्कृती निर्माण होण्याची गरज आहे. सरकारसोबत अफार्मसारख्या संस्थांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे थोरात यांनी सांगितले.