नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटमध्ये दिवाळीनिमीत्त सामुहीक चोपडा पुजेचे आयोजन केले होते. खरेदीदारांनी वर्षभराची थकबाकी जमा केल्यामुळे मार्केटमध्ये लक्ष्मीचे आगमन झाल्याने मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजारसमितीमधील व्यापाराला शेकडो वर्षाची परंपरा आहे. स्वातंत्र्यपुर्वी काळापासून अन्न,धान्य, भाजी व फळांचा होलसेल व्यापार मुंबईमध्ये सुरू होता. बाजारसमितीची स्थापना झाल्यानंतर तो नवी मुंबईमध्ये स्थलांतरीत करण्यात आला. मार्केटमध्ये प्रत्येक सण व उत्सव आनंदाने साजरा केला जातो. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी भाजी मार्केटमध्ये अनेक वर्षांपासुन सामुहीक चोपडा पुजन आयोजीत केले जात आहे. भाजीपाला व्यापारी महासंघ व माजी संचालक शंकर पिंगळे यांनी ए विंगमध्ये पुजेचे आयोजन केले होते. व्यापारी, कामगार, खरेदीदार व इतर अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. भाजी मार्केटमधील खरेदीदार व व्यापारी यांच्यामध्ये वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध निर्माण झाले आहे. खरेदीदारांकडे पैसे नसले तरी व्यापारी त्यांना उदारीवर माल देत असतात. दिवाळीदिवशी वर्षभरातील सर्व उदारी जमा केली जाते. यामुळे खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये लक्ष्मीचे आगमन होते. लाखो रूपयांची उलाढाल होत असल्यामुळे मार्केटमध्ये पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. चोपडा पुजनासोबत व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी येणाऱ्या भाजीपाल्याचीही पुजा केली. शेतकऱ्यांनी पाठविलेला भाजीपाला हीच खरी लक्ष्मी अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे. या कार्यक्रमास माजी संचालक शंकर पिंगळे, संजय पानसरे, उपसचीव व्ही. एस. राठोड व इतर व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. >व्यापाऱ्यांचा कुटुंब मेळावा भाजी मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी पारंपारीक पद्धतीने चोपडा पुजन केले जाते. मुंबईवरून मार्केट स्थलांतर झाल्यानंतरही ही परंपरा जपली आहे. चोपडा पुजन निमीत्त बाजारसमितीचे अधिकारी, इतर मार्केटमधील व्यापारी व खरेदीदारही मार्केटमध्ये उपस्थित रहात असतात. - शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी
एपीएमसीमध्ये चोपडी पूजन!
By admin | Published: October 31, 2016 2:35 AM