मुंबई : घराबाहेर मित्र-मैत्रिणींसोबत खेळत असलेल्या ११ वर्षीय चिमुरडीचे अज्ञात इसमाने अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मुलुंड परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मुलुंडच्या आनंदनगर टोलनाका परिसरातील झोपडपट्टीत ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सायंकाळी ती नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळत होती. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी आली नाही. त्यामुळे आई-वडिलांनी तिची शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत तिचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी रात्री नवघर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. नवघर पोलिसांनीही तत्काळ शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान रविवारी सकाळी पूर्व द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या खाली ही मुलगी बेशुद्धावस्थेत पोलिसांना आढळली. त्यांनी तिला जवळच्या वीर सावरकर रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.शवविच्छेदन अहवालात या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलगी राहत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रक उभे राहत असल्याने पोलिसांनी संबंधितांवर संशय व्यक्त केला असून, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती झोन सातचे पोलीस उपायुक्त राजेश प्रधान यांनी दिली. (प्रतिनिधी)
मुलुंडमध्ये चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या
By admin | Published: September 19, 2016 3:43 AM