- कपिल गुरवआचरा (जि. सिंधुदुर्ग) : मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे. गावपळणीसाठी गावकऱ्यांनी शनिवारी गाव सोडून गुराढोरांसह गावच्या वेशीबाहेर मुक्काम केला आहे. ग्रामदेवता श्री देव रवळनाथाने दिलेल्या आदेशानुसार पुढील तीन दिवस गावाबाहेर राहून गावकरी पुन्हा आपल्या घरी परततील.मालवण शहरापासून २२ किलोमीटरवर चिंदर आहे. या गावची गावपळण दर तीन वर्षांनी होते. मात्र, मागील आठ वर्षांत काही अडचणींमुळे ती झाली नाही. मात्र, यावर्षी तिला मुहूर्त मिळाला. शनिवारी दुपारी तीन वाजता गावातील लोकांनी आपल्या घरादाराला कुलूप लावून, दारावर माडाचे सावळे लावून, घराभोवती राखेचे रिंगण आखून गाव सोडला. गावसीमेच्या बाहेर जाताना सर्व साहित्य गुरेढोरे, पाळीव प्राणी, कोंबड्या यांच्यासह पुढील तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी गावाला आणि घराला निरोप दिल्याने गाव सुनसान झाले आहे.या काळात गावातील शाळेसह सर्व शासकीय कार्यालयेही बंद असणार आहेत.ग्रामस्थांनी वेशीबाहेर माळरानावर तात्परत्या झोपड्या उभारल्या आहेत. जनावरांसाठी गोठा उभारला आहे. तीन दिवस लोकं एकत्रित स्नेहभोजन, विविध सामूहिक कार्यक्रम, नाचगाणी, भजनांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमदेखील करणार आहेत, तर काही मंडळी तीन दिवस गावाकडे जायचे नसल्याने एखाद्या सहलीचे आयोजन करूनही दौराही करणार आहेत.सिंधुदुर्गात गेल्या ३०० हून अधिक वर्षांपासून ‘गावपळण’ परंपरा चालत आली आहे. आचरा, चिंदर आणि वायंगणी या गावात आजही ती पाळली जाते. गावपळणीच्या तीन दिवसांत गावात फक्त आणि फक्त भूताखेतांचा वावर असतो, असा येथील लोकांचा समज असल्याने गावकरीच नव्हे, तर परगावची मंडळी या गावाकडे फिरकत नाहीत.>अशी ठरते गावपळणीची तारीखत्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसºया दिवशी रवळनाथाचा अवसरी (देवताचा तरंग घेणारा) गावपळणीविषयी भाष्य करतो. तद्नंतर गावातील मानकरी श्री देव रवळनाथाच्या पाषाणाला कौल लावतात. रवळनाथाने उजवा कौल दिल्यानंतर गावपळणीची तारीख गावकºयांसमोर गावचे मानकरी जाहीर करतात.
गावपळणीसाठी चिंदरकर गुराढोरांसह वेशीबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:28 AM