लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षीच्या प्रवेशासाठीची (एफवाय) दुसरी यादी बुधवारी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयांत प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीच्या तुलनेत विज्ञान शाखेचा टक्का अधिक प्रमाणात घसरला आहे. पण, पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत कला आणि वाणिज्य शाखेची टक्केवारी केवळ २ ते ३ टक्क्यांनीच खाली आली आहे. त्यामुळे वाणिज्य व कला शाखेत प्रवेशासाठी चुरस आहे. एफवायच्या विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी पहिल्या यादीचा कटआॅफ हा ९० ते ८५ टक्के इतका होता. पण, आता हा टक्का नामांकित महाविद्यालयांसह काही अन्य विद्यालयांमध्ये ६५ ते ७० टक्क्यांच्या दरम्यान आला आहे. याउलट चित्र वाणिज्य शाखेच्या प्रवेशात पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयात वाणिज्य शाखेत पहिल्या यादीचा कटआॅफ हा ९४ ते ९५ टक्के इतका होता. पण, दुसऱ्या यादीत ही टक्केवारी ९२ टक्क्यांवर आली आहे. अन्य महाविद्यालयात ही टक्केवारी ८५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. नामांकित महाविद्यालयात व्होकेशन अभ्यासक्रमांसाठीचा कटआॅफ ८५ टक्क्यांहून अधिक असून काही महाविद्यालयांत तो ८० टक्क्यांपर्यंत आला आहे.
वाणिज्य, कला शाखेत प्रवेशासाठी चुरस
By admin | Published: June 29, 2017 3:17 AM