जळगाव : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून काढून तो नाशिक सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे, या वृत्तास पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे.सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत हा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी शिवसेना आणि काँग्रेसने केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत दोन स्तरांवर चौकशी सुरूहोती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंग यांच्याकडे विभागीय चौकशी होती; ती आता पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला आहे. तर नाशिकचे आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यामार्फत दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी याने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर बुधवारी न्यायालयात सरकार, फिर्यादी व आरोपीच्यावतीने तब्बल अडीच तास युक्तीवाद चालला. न्यायालय याबाबत शुक्रवारी निर्णय देणार आहे.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई येथे पोलीस महासंचालक दीक्षित यांची भेट घेतली. त्यांनी याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी केली असता, तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती सेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांनी ‘लोकमत’ला दिली. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनीही याला दुजोरा दिला.
सादरे आत्महत्येचा तपास सीआयडीकडे
By admin | Published: October 30, 2015 1:29 AM