कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी संशयित सांगली पोलिसांच्या घरांवर सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) तीन पथकांनी छापे टाकले. संशयित कुटुंबासह बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती ‘सीआयडी’च्या सूत्रांनी दिली. शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलिस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मैनुद्दीन मुल्ला, प्रवीण भास्कर-सावंत यांच्या विरोेधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. संशयित पोलिसांच्या अटकेसाठी तीन विशेष पथके नियुक्त केले आहेत. संशयितांनी मोबाईल बंद ठेवल्याने त्यांचे लोकेशन मिळून आले नाही. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये राहणाऱ्या मैनुद्दीन मुल्ला याच्या घराची झडती घेत पत्नीचा जबाब घेतला. रात्री उशिरा पोलिस अधीक्षक बनसोडे यांनी शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ खोलीची पाहणी करून पंचनामा केला. या गुन्ह्यात फिर्यादी झुंझारराव सरनोबतयांच्यासह आणखी काहीजणांकडे ‘सीआयडी’चे पथक चौकशी करणार आहे. (प्रतिनिधी)
सांगलीत संशयित पोलिसांच्या घरांवर ‘सीआयडी’चे छापे
By admin | Published: April 25, 2017 2:23 AM