CIDCO Land Scam Case : आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या, सिडको प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 12:48 PM2018-07-05T12:48:03+5:302018-07-05T12:56:18+5:30
पावसाळी अधिवेशनाच्या आज दुस-या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नागपूर- पावसाळी अधिवेशनाच्या आज दुस-या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. सिडको जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं. विरोधी पक्षांनी अर्धी वस्तुस्थिती मांडली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या गेल्या आहेत.
आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर जमिनीचं वाटप झालं होतं. या जमिनी जिल्हाधिका-यांच्या अखत्यारितील आहेत. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याधिका-यांचे अधिकार वाढवण्यात आले. जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिला आहे.
सिडको प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करू, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. सिडकोच्या जमीन वाटप प्रकरणासह यापूर्वीच्या सरकारमध्ये अशाच प्रकारे देण्यात आलेल्या 200 जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मी काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे दुसऱ्यावर दगड मारण्यापूर्वी विचार करा, मी राजीनामा देणार नाही, पण तुम्ही खोटे आरोप केलेत म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामे द्यावेत, असा पवित्राही मुख्यमंत्र्यांनी घेतला. विरोधकांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी यासाठी सत्ताधारी आमदार आक्रमक झालेत.