नवी मुंबई : सिडकोने राज्याचे भवन उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारला वाशी येथे दिलेल्या भूखंडाचे वाटप सिडकोने रद्द केले आहे. तशा आशयाची नोटीस संबंधित व्यवस्थापनाला सिडकोने बजावली आहे. अटी व शर्तींचे उल्लंघन करून भूखंडाचा गैरवापर करीत सदर इमारतीचा कमर्शिअल वापर केल्याप्रकरणी सिडकोने ही कारवाई केली आहे. अरुणाचल सरकारने या भूखंडावर अतिथीगृह अथवा एम्पोरियमची उभारणी न करता सिडकोच्या परवानगीशिवाय बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर एका बिल्डरला देवून टाकला. त्यानंतर अरुणाचल प्रदेश भवनाच्या या इमारतीत कल्याण ज्वेलर्ससहित इमारतीच्या अन्य मजल्यांवर विविध बिल्डर्स व कंपन्यांनी वाणिज्यिक वापर सुरू करण्यात आला. याबाबतची माहिती सिडकोला प्राप्त झाल्यानंतर सिडकोने २ मे २०१४ रोजी अरुणाचल प्रदेश शासनास कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला होता. सिडकोच्या नोटिसीला अरुणाचल प्रदेश सरकारने ३० जून २०१४ रोजी दिलेले उत्तर करारनाम्यातील अटी व शर्तींशी विसंगत आढळून आल्याने महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे सदर भूखंड वाटप रद्द करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. याप्रकरणी अरुणाचल सरकारला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली. (प्रतिनिधी)
अरुणाचल भवनला सिडकोची नोटीस
By admin | Published: January 19, 2016 4:05 AM