कमलाकर कांबळे,
नवी मुंबई- प्रस्तावित पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोच्या अधिकार क्षेत्राला कात्री लागणार आहे. पनवेल महापालिकेत कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, तळोजा या सिडको वसाहतीबरोबरच आजूबाजूच्या ६८ गावांचा समावेश होणार आहे. पनवेल महापालिकेत खारघरचा समावेश करण्यास सिडकोने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे नव्या महापालिकेमुळे सिडकोचे कार्यक्षेत्र केवळ प्रस्तावित पुष्पकनगर आणि खारघर इथपर्यंतच मर्यादित राहणार आहे.कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रस्तावित महापालिकेबाबतचा आपला अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेचा मुहूर्त समीप आल्याने संबंधित सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पनवेल महापालिकेमुळे सिडकोच्या चार वसाहतींसह नगरपालिका कार्यक्षेत्रातील ६८ गावे विकासाच्या टप्प्यात येणार आहेत. असे असले तरी यामुळे सिडकोच्या कार्यक्षेत्राला मात्र मर्यादा पडणार आहेत. नवी मुंबई शहराची निर्मिती करताना सिडकोने १४ नोड्स विकसित केले आहेत. त्यापैकी वाशी, ऐरोली, नेरूळ, सानपाडा, कोपरखैरणे आणि सीबीडी-बेलापूर हे सात नोड्स नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. तर उर्वरित खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, उलवे, द्रोणागिरी व प्रस्तावित पुष्पकनगर हे सात नोड्स अद्याप सिडकोच्या ताब्यात आहेत. यापैकी कळंबोली, पनवेल, कामोठे, उलवे व द्रोणागिरी या वसाहतीचा प्रस्तावित पनवेल महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात सिडकोकडे फक्त खारघर आणि पुष्पकनगर हे दोनच नोड्स शिल्लक राहणार आहेत. विशेष म्हणजे स्मार्ट दक्षिण नवी मुंबई प्रकल्पाअंतर्गत सिडकोने कळंबोली, कामोठे, उलवे व पनवेल वसाहतीत कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यापैकी अनेक कामे सुरूही केली आहेत. पनवेल महापालिकेच्या अधिकृत स्थापनेनंतर विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.