नवी मुंबई : राज्य सरकारचे सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोत जवळपास ५२ टक्के अनुशेष भरावयाचा बाकी आहे. याची गंभीर दखल विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतली आहे. तातडीने कार्यवाही करीत पुढील चार महिन्यांत हा अनुशेष भरावा, अशी सूचना समितीने सिडको प्रशासनाला केली आहे. अनुसूचित जाती कल्याण समितीने २७ आणि २८ एप्रिल असे दोन दिवस नवी मुंबई महापालिकेसह सिडको आणि पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. या भेटीअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आदींची तपशीलवार माहिती घेतली. शासनाच्या अंगीकृत असलेल्या या तिन्ही प्राधिकरणांपैकी महापालिकेचे काम उत्तम असल्याचा निर्वाळा या समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश खाडे यांनी दिला. तिन्ही प्राधिकरणांच्या पाहणीनंतर सिडको सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत खाडे यांनी यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेत अनुशेष कमी असून तो भरावयाच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच मागासवर्गीयांसाठी असलेला निधी कोणत्या सुविधांवर खर्च करायचा समितीने काही सूचना केल्याचे खाडे यांनी सांगितले. या दौऱ्यामध्ये समितीने ऐरोली येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भेट दिली. पुढील १४ महिन्यांत स्मारकाचे काम पूर्ण करावे, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना महापालिकेला केल्याचे खाडे यांनी सांगितले.
सिडकोत ५२ टक्के अनुशेष शिल्लक
By admin | Published: April 29, 2016 3:27 AM