सांगली, दि. 6 - वारणानगर (जि. कोल्हापूर, ता. पन्हाळा) येथील सव्वानऊ कोटीच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट व सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या सांगलीतील निवास्थानावर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने शुक्रवारी मध्यरात्री छापे टाकले. दोघांची कसून चौकशी करुन निवास्थानाची तासभर झडती घेण्यात आली. पण हाती काहीच लागले नाही.सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक घनवट यांच्या पथकाने गतवर्षी मिरजेतील बेथेलहेमनगर येथील झोपडवजा घरात छापा टाकून सुमारे सव्वातीन कोटीची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी मैनूद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत त्याने ही रक्कम वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतून चोरी केल्याची कबूली दिली. घनवटच्या पथकाने वारणानगर येथेही छापा टाकून कोट्यावधीची रोकड जप्त केली होती. या कारवाई दरम्यान घनवट ‘टिम’ने सुमारे सव्वानऊ कोटीची रक्कम परस्पर हडप केल्याचे चार महिन्यापूर्वी उघडकीस आले. त्यानुसार घनवट, चंदनशिवे सातजणांविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी कोल्हापूर सीआयडीचे पथक तपास करीत आहे. दोन दिवसापूर्वी घटवट, चंदशिवे सीआयडीला शरण आले. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. प्रभारी पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, निरीक्षक स्वाती गायकवाड यांचे पथक घनवट व चंदनशिवेला घेऊन शुक्रवारी मध्यरात्री सांगलीत दाखल झाले. सांगली सीआयडीच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या मदतीने पथकाने घटवट व चंदनशिवेच्या निवास्थानावर छापा टाकला. घनवट शंभरफुटी रस्त्यावरील सिद्धीविनायक पूरम संकुलात, चंदनशिवे विश्रामबागच्या वारणालीतील पाचव्या गल्लीत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. पथकाने दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापा टाकून फ्लॅटमध्ये झडती घेतली. परंतु हाती काहीच लागले नाही. पहाटेच्या सुमारास पथक कोल्हापूरला रवाना झाले. पाच जणांच्या मागावरसहाय्यक पोलिस फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, रवी पाटील हे या प्रकरणातील चौघे अजूनही फरारी आहेत. कुलदीप कांबळे यास तात्पूरता जामीन मिळाला आहे. गेल्या आठवड्यातही सीआयडीचे पथकाने सांगलीत येऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पाच पोलिसांची चौकशी केली होती. त्यांच्याकडे फरारी असलेल्या पोलिसांबाबत चौकशी केली.
घनवट, चंदनशिवेच्या सांगलीतील निवासस्थानावर ‘सीआयडी’चे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 10:38 AM