एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला मोठा धक्का बसला आहे. या घडामोडींबाबत आज एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात सध्या हे जे काही चालू आहे त्यावर मी २२ तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेँण्यात आली. त्यावेळी विविध मुद्द्यांसोबत राज ठाकरेंनी शिवसेनेतील फूट आणि महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीबाबत संक्षिप्त भाष्य केलं. यावेळी मनसेचा एकच आमदार आहे. त्याने पक्ष आणि चिन्हावर दावा केला, तर काय निवडणूक आयोग काय करणार, या अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता, राज ठाकरे म्हणाले की, काय आहे ना की, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. महाराष्ट्रात हे जे काही चालू आहे त्यावर मी २२ तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलंय. शिवसेनेचं नावं, पक्षचिन्ह गेलं, हे दुर्दैवी झालं की चांगल्या माणसांच्या हातात शिवसेना गेली, काय वाटतं? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, टिझर ट्रेलर नाही २२ तारखेला सिनेमाच दाखवणार, मी आता या विषयावर बोलणार नाही,’’असे राज ठाकरे म्हणाले.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. आधी जे काही असायचं ते आमने-सामने होत असे. परवा मी बाळासाहेबांच्या फोटोच्या अनावरणासाठी विधिमंडळामध्ये गेलो. तिथे सगळे आमदार समोर बसले होते. त्यातील कोण कुठल्या पक्षातील आहे हेच कळत नव्हतं. एखाद्या आमदाराने ओळख करून दिली तर तू कुठल्या पक्षातला, असं विचारावं लागतं, असा टोलाही त्यांनी लगावला.