प्रज्ञा म्हात्रे,
ठाणे- गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. उत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्याने मंडळांमधील तयारी वेगात सुरू आहे. राजकीय पक्षांनी दहीहंडीचे वातावरण तापवल्याने गेल्या दोन दिवसांत कामाला थोडा ब्रेक लागला असला तरी शुक्रवारपासून पुन्हा कामांना वेग येईल. भव्य मूर्ती आणणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी मंडपांचे काम सुरू करून सजावटीस सुरूवात केली आहे. इतर मंडळे मात्र मंडप उभारण्यात मग्न आहेत. गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीच उत्सवाच्या रुपरेषांसंदर्भात मंडळांची आखणी सुरू होते. मंडपापासून ते अगदी सजावटीपर्यंतच्या संदर्भात बैठका, चर्चा सुरू होतात आणि उत्सव पंधरवड्यावर आला की प्रत्यक्ष कामाला सुरूवात होते. आपापली दैनंदिन कामे उरकली, की मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आखणीला बसतात. आताही उत्सव दहा दिवसांवर आल्याने मंडळांतील कामाची लगबग वाढली आहे. मूर्ती अद्याप मंडपात आलेल्या नाहीत. शनिवार-रविवारपासून वेगवेगळ््या मंडळात मूर्ती येण्यास सुरूवात होईल. मंडप, सजावट, रोषणाईची कामे सुरू झाली असली, तरी दहीहंडीचा उत्साह ओसरला की त्या कामांनाही वेग येईल. ठाण्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडपाचे काम पूर्ण होत आले आहे. ज्यांचे काम पूर्ण झाले आहे, त्यांच्या सजावटीच्या बैठका सुरू आहेत. ज्यांची सजावट मोठी आहे, त्यांनी त्याची सुरूवात केली आहे. सजावट पूर्ण झाल्याशिवाय मूर्ती न आणण्याचा काही मंडळांचा पवित्रा कायम आहे. १ सप्टेंबरपासून मात्र ठाण्यातील मंडळांच्या मंडपात बाप्पाचे आगमन होईल. सुरक्षेपासून इतर कारणे विचारात घेऊन काही मंडळे दोन दिवस अगोदर मूर्ती आणणार आहे. ज्यांची त्याच दिवशी वाजत-गाजत मिरवणुकीने मूर्ती आणण्याची परंपरा कायम आहे, ती मंडळे त्याच दिवशी मूर्ती आणणार आहेत. परराज्यांतील मूर्ती मात्र दोन दिवसांत रवाना होतील.>सजावटीवर प्रभाव निवडणुकांचासजावटीचे विषय नेमके कोणते असतील, यावर सर्वच मंडळांनी सध्या मौन बाळगले आहे. परंतु यंदा निवडणुकीचा काळ असल्याने शहराचा विकास, स्मार्ट सिटी यासारखे विषय सजावटीत प्रामुख्याने पाहायला मिळतील. सध्या मंडपाचे काम सुरू आहे. दहीहंडी झाल्यानंतर सजावटीच्या कामाला सुरूवात होईल. आमचे मंडळ आदल्या दिवशी गणेशमूर्ती आणणार आहे.- संदीप नटे, शिवाईनगर सार्वजनिक मित्र मंडळ, शिवाईनगर.